मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी ( ता . मालवण ) गावाने बागायतीसह मत्स्यपालन , काथ्या उद्योग व कृषी पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना दिली . त्यातून तरुण व महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी ( ता . मालवण ) गावाने बागायतीसह मत्स्यपालन , काथ्या उद्योग व कृषी पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना दिली . त्यातून तरुण व महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला असून गावाची आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत झाली आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण – आचरा मार्गावर मालवण शहरापासून अवघ्या आठ किलोमीटरवर आणि कालावल खाडीच्या कवेत वसलेले हडी गाव जैवविविधतेने समृद्ध आहे . गावात १५ वाड्या असून , लोकसंख्या दोन हजारांच्या सुमारास आहे . पारंपरिक पद्धतीने गाव भातशेती करायचे . पण आर्थिक सक्षमतेसाठी ग्रामस्थांचा आंबा , काजू , नारळ आदी पिकांकडे कल वाढला . त्याखालील क्षेत्र झपाट्याने वाढले . याच वेळी गावातील तरुणाई रोजगाराच्या नव्या वाटा शोधत होती .
संकटात शोधली संधी :
गावाला सहा किलोमीटर लांबीची खाडी लाभली आहे . पूर्वेकडून वाहणाऱ्या गडनदीचे बांदीवडेच्या पुढे खाडीत रूपांतर झाले . कांदळवन क्षेत्र तयार झाले . बंधारे ओलांडून खाडीतील खारे पाणी शेतजमिनीत घुसू लागले . शेकडो एकर जमीन क्षारपड होऊ लागली . भातशेती , बागायती वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न शेतकरी करीत होते . परंतु संकट थांबत नव्हते . गावातील काही तरुणांनी पुढे येत क्षारपड जमिनीत मत्स्यपालन करण्याचा विचार मांडला . तेवढ्यावर न थांबता दोघांनी तमिळनाडू येथे जाऊन मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घेतले . त्यातून गावात कोळंबी प्रकल्पाला सुरुवात केली . मात्र तांत्रिक समस्यांमुळे शेतकरी काहीसे आर्थिक अडचणीत आले .
कांदळवन संरक्षण :
काही वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमांतर्गत ( यूएनडीपी ) कांदळवन संरक्षित करण्याच्या प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली . काही गावांनी विरोध केला . परंतु हडी गावाने तो राबविण्याची मागणी केली . त्यानुसार राज्य शासनाच्या साह्याने कामास सुरुवात झाली . प्रकल्पांतर्गत माशांच्या स्थानिक प्रजाती पालनाचा विचार पुढे आला . आर्थिक साह्याची तयारी दर्शविली . कांदळवन संरक्षण उपजीविका योजना असे नामकरण झाले . खाडीच्या पाण्यात सापळ्यात मत्स्यबीज सोडून वाढ करण्याचे प्रशिक्षण गावातील काही तरुणांना देण्यात आले . सापळे , मत्स्यबीज , खाद्य पुरविण्यात आले . हळूहळू चांगला रोजगार निर्माण होऊ लागला .
काथ्या उद्योगांची उभारणी :
शासनाच्या चांदा ते बांदा योजनेअंतर्गत गावात भाग्यश्री महिला काथ्या उद्योगाची उभारणी झाली आहे . त्यास ग्रामपंचायतीने २० गुंठे जमीन दिली आहे . संस्थेमार्फत काथ्या पुरवून गरजेनुसार वस्तू बनवून घेतल्या जातात . गावातील कित्येक टन सोडण विनावापर वाया जात होती . प्रकल्पामुळे त्यास चांगली किंमत मिळत आहे.
कृषी पर्यटनाला चालना :
मालवण शहरात वर्षाला किमान पाच लाखांपर्यंत पर्यटक येत असावेत . हडी गावाने देखील कृषी पर्यटनाला चालना दिली . विविध प्रकारचे पक्षी , माशांच्या जाती पर्यटकांना दाखवून त्याचे महत्त्व सांगितले जाते .
हडी गाव दृष्टिक्षेपात :
• भौगोलिक क्षेत्र -८७४ एकर •
आंबा बाग क्षेत्र- २८७ एकर , उलाढाल सुमारे अडीच कोटी .
• नारळ- ११० एकर ,
उलाढाल -१ कोटी , काजू -५२ एकर • सौरऊर्जा युनिटद्वारे ग्रामपंचायतीला वीजपुरवठा .
• ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार
• आर . आर . पाटील सुंदर गाव , स्मार्ट व्हिलेज , तंटामुक्त गाव- जिल्हास्तरावर प्रथम . उद्यमशील बाबी • मत्स्यपालन युनिट्स- ८०. प्रति युनिट- एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल कोळंबी प्रकल्प युनिट्स- दोन- ( पाच एकरांत ) उत्पादन . ५० टन • एकूण मत्स्योत्पादन -५७ टन , प्रति किलो सरासरी दर
उद्यमशील बाबी :
• मत्स्यपालन युनिट्स- ८०. प्रति युनिट- एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल
• कोळंबी प्रकल्प युनिट्स- दोन- ( पाच एकरांत ) उत्पादन ५० टन
• एकूण मत्स्योत्पादन -५७ टन , प्रति किलो सरासरी दर २०० रु . .
• मत्स्यपालन – उलाढाल -१ कोटी १४ लाख रु . केरळ , कर्नाटक राज्यातून मत्स्यबीज आणून डिसेंबर ते जानेवारीत सापळ्यांत सोडले जाते .
• तांबोशी , गुंजी , काळुदर , शिनाले , जिताडा , कालव , खेकडा आदींचे पालन .
• सात महिन्यांत ७०० ते ८00 ग्रॅम वजनाचा मासा तयार होतो .
• गोव्यातील व्यापाऱ्यांकडून गावात येऊन प्रतिकिलो ३०० ते ३५० रुपये दराने खरेदी .
• काथ्या उद्योग रोजगार- थेट -६ महिला , ४ पुरुष
• हडी , वायंगणी आणि कांदळवन- तीन गावांतील ७५ हून अधिक महिलांना घरीच रोजगार
• काथ्या उद्योगातून २० लाखांपर्यंत , तर पर्यटन व्यवसायातून दहा लाखांची उलाढाल
नारळाच्या टाकाऊ सोडणाला उसापेक्षा दर :
हडी गावात नारळ झाडांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत असावी . नारळ काढल्यानंतर त्याचे सोडण फेकून दिले जायचे . परंतु काथ्या उद्योगामुळे त्यास उसापेक्षाही जास्त म्हणजे प्रति टन तीन हजार रुपये दर मिळू लागला . दर उसापेक्षा अधिक आहे .
जैवविविधता केंद्र :
गावात १०१ प्रकारचे रंगीबेरंगी , दुर्मीळ पक्षी आढळून आले आहेत . त्यांची छायाचित्रे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावात लावली आहेत . यात लालचकोत्री , सोनपाठी सुतार , तांबट , बदामी डोक्याचा राघू , पोपट , चातक , पावशा , निळकंठ , वेडा , मोर , सोनकपाळी पर्णपक्षी , टकाचोर अशी विविधता आहे . ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचे ‘ बुकलेट ‘ तयार केले आहे .
प्रतिक्रिया :
पर्यावरणाला धक्का न लावता गावाचा विकास करण्याचा निर्धार केला . विविध प्रकल्पांद्वारे गावातच रोजगार निर्माण व्हावा यादृष्टीने विविध संकल्पना राबविल्या . त्यातून गावाची आर्थिक उलाढाल वाढली आहे .
-महेश मांजरेकर , सरपंच ८७६६४७१६००
भाग्यश्री महिला उद्योगातून आम्हाला काथ्या पुरविला जातो . घरातील काम सांभाळून चार तास देऊन दोरी , पायपुसणी बनवून संस्थेला पुरवतो . कोणतीही गुंतवणूक न करता त्यातून महिन्याला उत्पन्न सुरू झाले आहे .
– वेदाती साळकर
खाडीतील मत्स्यपालनातून सात महिन्यांत अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते . प्रतिकिलो तीनशे ते साडे तीनशे रुपये दराने मासे विकले जातात .
-प्रवीण मांजरेकर , ९ ३० ९ ५६ ९ ६८१
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत काथ्या उद्योगाची उभारणी झाली . जिल्ह्याचे मुख्य समन्वयक राजेश कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील चारही युनिट्सचे काम चालते . प्रकल्पाची उलाढाल २० लाखांच्या जवळपास आहे .
जितेंद्र वजराठकर , प्रकल्प समन्वयक , ७५८८६२७००५